शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यात वृक्ष संवर्धन व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रांजणगाव सांडस येथील वृक्ष मित्र पै. उमेश रणदिवे यांचा बारामती येथे विशेष सन्मान करण्यात आला.
बारामती येथील कॉलेज ऑफ फार्मसी येथे कार्य हीच ओळख फाउंडेशन व झाडांचं घर प्रकल्पाचे समीर बनकर यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माळरानाचे पंख या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य राजेंद्र पाटील यांसह चांडाळ चौकडीच्या करामती फेम अभिनेते रामभाऊ जगताप, भरत शिंदे, सुभाष मदने आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात निसर्ग छायाचित्रकार अभ्यासक राज पासलकर, पर्यावरण विषयक पत्रकार श्रीकिशन काळे, डॉक्टर श्रीकृष्ण बावकर, रविकिरण सासवडे, प्रशांत मुथा, रोहित आणि रक्षिता बनसोडे, फलटणचे सचिन सोनवलकर, मूर्टीचे किरण जगदाळे, रांजणगाव सांडस येथील उमेश रणदिवे, पणदरे ग्रामविकास मंच या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उमेश रणदिवे यांनी शिरूर तालुक्यात गेले 14 वर्षांपासून पर्यावरण संवर्धन कार्यात झोकून देत मोठ्या प्रमाणावर रांजणगाव सांडस येथे झाडे लावण्याची कामं केली आहेत. त्याचबरोबर परिसरात जनजागृतीची मोहीम त्यांनी हाती घेतले आहे. उमेश रणदिवे यांच्या पर्यावरणात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.











