सेंद्रिय शेती आणि महिला नेतृत्व बळकट करण्याचे सुनंदाताई पवार यांचे आवाहन
बारामती : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत’ राज्यातील १२ जिल्ह्यांतील १६ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ३२ महिला संचालकांसाठी धान्य व कडधान्य प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया तसेच गोदाम व्यवस्थापनाचे तीन दिवसीय प्रशिक्षण बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील भरडधान्य प्रक्रिया केंद्रात यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षणादरम्यान अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी महिला संचालकांशी संवाद साधत सेंद्रिय शेती, अन्नसुरक्षा आणि महिला नेतृत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी त्या म्हणाल्या की, देशात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून त्यामागे भेसळयुक्त आणि रासायनिक अवशेष असलेल्या अन्नपदार्थांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेसिड्यू-फ्री किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करून त्यापासून उत्पादित मालावर प्रक्रिया केली, तर ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यांनाही अधिक मूल्य मिळेल.
त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यभर सुरू असलेल्या कारवायांचा संदर्भ देत सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न भेसळीविरोधात सुरू असलेल्या कारवायांमुळे आपण रोज किती भेसळयुक्त अन्न खात आहोत, याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण अन्न उत्पादन ही काळाची गरज आहे.
महिला सक्षमीकरणावर भर देताना सुनंदा पवार म्हणाल्या, महिलांना ३५ टक्के आरक्षण मिळाले असले तरी अनेक ठिकाणी महिला पदांवर असल्या, तरी निर्णय पुरुष घेतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे नेतृत्व महिलांनीच सक्षमपणे करावे, निर्णय स्वतः घ्यावेत आणि उद्योगवाढीसाठी पुढाकार घ्यावा.
यावेळी त्यांनी सहभागी सर्व महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच भीमथडी जत्रेत या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देत सर्व महिला संचालकांना शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणात विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. फूड एक्सपर्ट अमर केंजळे यांनी धान्याची प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन, अन्न व्यवसायासाठी आवश्यक FSSAI नियम व गुणवत्ता नियंत्रणाची मूलभूत माहिती दिली. वैभव यादव यांनी भरडधान्याच्या दुय्यम प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देत पास्ता, शेवया, पापड आदी उत्पादनांची निर्मिती व यंत्रसामग्रीची माहिती दिली.
सौ. पूर्वजा जोशी यांनी भरडधान्यापासून बिस्किटे, प्रीमिक्स आणि विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. सुहास ननावरे यांनी गोदाम व्यवस्थापन, परवाने, साठवण व्यवस्था व बांधकामासंबंधी माहिती दिली. तर अभिजीत देशमुख यांनी भरडधान्यांचे प्रकार, पौष्टिक गुणधर्म, प्रक्रिया केंद्रातील उपलब्ध सुविधा यांची माहिती देत संपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वय यशस्वीपणे सांभाळला.
या प्रशिक्षणामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवसाय व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून, ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.











