महान्यूज : आजची गझल
तसे फार नाही, न होते तुला मागण्यासारखे
तरी शोधले तू बहाणे किती टाळण्यासारखे
••••••••••●●◆◆●●★★●●◆◆●●••••••••••
कुणी कापले पंख आभाळ देऊन झेपावण्या?
दुजे पाप नाही अशी बंधने लादण्यासारखे
••••••••••●●◆◆●●★★●●◆◆●●••••••••••
कसे अन् किती काळ न्यावे निभावून मी, सांग ना
असे काय आहे इथे एवढे भावण्यासारखे?
••••••••••●●◆◆●●★★●●◆◆●●••••••••••
किती वाद, चर्चा, भल्या अन् बुऱ्या बातम्या रंगल्या
गुन्हेगार आयुष्य होते खरे गाजण्यासारखे!
••••••••••●●◆◆●●★★●●◆◆●●••••••••••
कथा, नाट्य, नेपथ्य सारे किती आगळेवेगळे,
तुझ्या संहितेतील विश्रामही वाचण्यासारखे!
••••••••••●●◆◆●●★★●●◆◆●●••••••••••
खुल्या पुस्तकासारखी आज झाली मनाची दशा,
नसे या कहाणीत काहीच रे झाकण्यासारखे!
••••••••••●●◆◆●●★★●●◆◆●●••••••••••
गझलकार – क्रांति साडेकर ‘रुह’, नागपूर
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










