इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यातील ३२ साखर कारखान्यांना ५१६ कोटींची शासनहमी मिळाली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील छत्रपती, निराभिमा कारखान्यासह पाच साखर कारखान्यांना १०० कोटींची थकहमी मिळालेली आहे.
येणाऱ्या गळीत हंगामात कारखान्यांना हंगाम घेता यावा, त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी भासू नयेत यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असून राज्यातील ३२ साखर कारखान्यांना ही थकहमी दिली आहे.
या ३२ कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील विघ्नहर, रावसाहेब पवार घोडगंगा, छत्रपती, निराभिमा , राजगड या पाच कारखान्यांचा समावेश आहे. या पाच कारखान्यांना दिलेली थकहमी ९८.०२ कोटींची असून विघ्नहर कारखाना – २४ कोटी, रावसाहेब पवार घोडगंगा कारखाना – २०.२७ कोटी, श्री. छत्रपती भवानीनगर – २८.४२ कोटी, निरा-भिमा सहकारी साखर कारखाना – १५.४० कोटी व राजगड कारखाना – १० कोटी अशी या थकहमी मंजूर झालेल्या कारखान्यांची स्थिती आहे.
येणाऱ्या हंगामात राज्यात विक्रमी ऊस उत्पादन होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कारखान्यांनी हंगाम घ्यावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने ही ५१६ कोटींची थकहमी देण्यात आली आहे.










