बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागाला रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. होळ, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, निंबूत आणि परिसरातील अनेक गावांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गारपिटीमुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके अक्षरशः जमिनीवर आडवी झाली आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाचीवाडी, वडगाव बुद्रुकसह बाधित भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











