पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनी नाट्यमय वळण घेतले आहे. पक्षात संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेश होऊन विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे आणि माजी आमदार तथा पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार नेमका कोण? याबाबतचा सस्पेन्स कायम असून अंतिम निर्णय अर्ज माघारीच्या दिवशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम संख्याबळ असल्याने ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पक्षातील काही स्तरांवर नाराजीही उघडपणे समोर आली.
विशेष म्हणजे उमेदवारीच्या चर्चेदरम्यान पक्षाच्या बैठकीतून सुनील टिंगरे बाहेर पडल्याची घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. त्याचवेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडे राजीनामा पाठवत उमेदवारी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म दिले आहेत.
त्यामुळे पक्षाने अद्याप अंतिम निर्णय राखून ठेवला असल्याचे मानले जात आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पक्षश्रेष्ठी अंतिम उमेदवार निश्चित करतील आणि त्यानंतरच अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत सुरू असलेली चुरस, नाराजी आणि उमेदवारीचा सस्पेन्स यामुळे राजकीय वातावरण तापले असून अर्ज माघारीच्या दिवशी पक्षाचा अंतिम डाव काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.











