अमरावती, नाशिक : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून, एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा पुसली धरणात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या या तिन्ही मुलांचे मृतदेह रविवारी दुपारी धरणात आढळून आले.
मृत मुलांमध्ये पंकज संतुलाल उईके (वय १०), प्रिया संतुलाल उईके (वय ८) आणि पवन संतुलाल उईके (वय ७) यांचा समावेश आहे. हे तिघेही नरखेड येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ते आपल्या आई-वडिलांकडे सातनूर शेतशिवारात आले होते.
संतुलाल उईके हे कुटुंबासह मनोहर निमकर यांच्या शेतातील खोपटात वास्तव्यास आहेत. शनिवारी (१७ मे) सकाळपासून ही तिन्ही मुले घरातून बाहेर गेली होती. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता.
रविवारी (१८ मे) दुपारी सातनूर गावालगतच्या पुसली धरणात तिन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच शेंदुर्जना घाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार, ही मुले अंघोळ करण्यासाठी किंवा मासे पकडण्यासाठी धरणाजवळ गेली असावीत आणि पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने वरुड तालुक्यावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातही अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. बोरगाव-चिखली परिसरात घराजवळ खेळत असताना दोन चिमुकले पाणी साठवण खड्यात पडून बुडाले. दर्शन जगदीश भोये (वय ४) आणि तन्मय निलेश भोये (वय ३) अशी मृत बालकांची नावे असून, दोघेही चुलत भाऊ होते.
घर बांधकामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्यात पडल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी तातडीने दोघांना बाहेर काढून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने चिखली गावातही शोककळा पसरली आहे.











