डॉ. महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नोटा मधून कोरोना पसरतो की नाही याच्याविषयी बराच संभ्रम होता, तसेच बरीच मतमतांतरे होती. परंतु यावरती आत्ता आरबीआयने आपली बाजू मांडली आहे.
नोटा या कागदापासून बनल्या असल्या कारणाने त्या जर संसर्गित हाताच्या संपर्कात आल्या, तर नोटा मधून जीवाणूंचा व विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. कोरोना वायरस देखील काही वेगळा नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी या वरती काही उपाय सुचवलेले आहेत.
त्यानुसार डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आरबीआयने नागरिकांना सुचवले आहे.
अधिकाधिक प्रमाणात डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर केल्याने कोरोनाच्या प्रसाराला नक्कीच आळा बसेल असे मत त्यांनी पुढे मांडले आहे.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) शासनाकडे असा प्रस्ताव ठेवला आहे की, वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता सिंथेटिक पॉलिमरपासून बनणाऱ्या नोटा चलनात आणण्याचा विचार करावा. ज्यामधून कोरोना संक्रमणाचा धोका कागदी नोटांपेक्षा नक्कीच कमी आहे. आता सरकार या वरती काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आरबीआयने एनइएफटी, आयएमपीएस, युपीआय आणि बीबीपीएस यांसारख्या पैसे हस्तांतरणाच्या सुविधांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुविधा नियमित उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे पैसे जमा करण्यासाठी किंवा एखादे पेमेंट करण्यासाठी गर्दीच्या जागी टाळण्याचे देखील आरबीआयने सांगितले आहे. जेणेकरून दोन लोकांमधील संपर्क टाळता येईल व सोशल डिस्टंसिंग चे पालन करता येईल.











