बारामती : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राला गरजू कुटुंबातून आतापर्यंत ५८८ महिला पोलिस देणारी शारदानगरच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची शारदा महिला अॅकॅडमी या कोरोनाच्या महामारीतही मोफत पोलिसपूर्व भरती प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन चालवत आहे. या केंद्रात सध्या ६०० हून अधिक मुली प्रशिक्षण घेत आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाने आता येत्या काही दिवसांत नव्याने पोलिस भरती घेण्याचे जाहीर केले असल्याने मुलींची तयारी करण्यासाठी हे मोफत प्रशिक्षण सुरूच राहणार आहे. त्याकरीता गरजू मुलींनी केंंद्राशी संपर्क साधावा.
संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील अनेक अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी जीवनाचा आधार ठरला. माणदेशापासून ते विदर्भापर्यंत आणि पुणे जिल्ह्यापासून अगदी दुर्गम आदिवासी भागापर्यंत ज्या महिलांना, युवतींना खर्चिक प्रशिक्षण घेणे शक्य नव्हते, अशांसाठी शारदा महिला अॅकॅडमी आधार बनली. या अकॅडमीतून आतापर्यंत ५८८ हून अधिक महिला पोलिस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आणि त्या आता राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. या महिलांनी केवळ आत्मनिर्भर व सक्षमीकरणाचे पाऊल पादाक्रांत केले नाही, तर आपल्या कुटुंबासह आपल्या सासरच्या कुटुंबाचेही जीवन बदलून टाकले. हा उपक्रम संस्था गेली दहा वर्षे नियमितपणे पार पाडत असून याहीवर्षी हा उपक्रम अखंड सुरू आहे. येणाऱ्या पोलिस भरतीच्या प्रक्रियेत अशाच गरजू कुटुंबातील मुलींनी आत्मनिर्भरतेचा टप्पा गाठावा यासाठी ही अकॅडमी मोफत प्रशिक्षण देणार आहे.
यासंदर्भात संस्थेेच्या खालील अॅडमिशन फॉर्मवरून संस्थेत प्रवेश घ्यावा असे आवाहन तनपुरे यांनी केले आहे.










