इंदापूर : महान्युज लाईव्ह
साखर आयुक्तांच्या सूचनेनुसार छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर येथे गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर 100 बेडचे कोविड रुग्णालय उभारणार आहे, त्यापैकी 50 बेडचे सुसज्ज रुग्णालय येत्या पंधरा दिवसात सुरू होणार आहे. येथील छत्रपती मंगल कार्यालयात हे रुग्णालय सुरू होणार आहे.
आज या मंगल कार्यालयाची पाहणी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी केली. यावेळी बारामतीचे नगरसेवक सुधीर पानसरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक गोविंद अनारसे, स्थापत्य अभियंता तानाजी खराडे, श्री दराडे, माजी कामगार संचालक दत्तात्रय निंबाळकर, कंझ्युमर सोसायटीचे अध्यक्ष संजय मुळीक आदी उपस्थित होते.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
यावेळी अध्यक्ष प्रशांत काटे म्हणाले, साखर आयुक्तांच्या सूचनेनुसार गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी 100 बेडचे केअर सेंटर उभा करण्याच्या सूचना कारखान्यात मिळालेल्या आहेत आणि कारखाना त्यानुसार हे केअर सेंटर उभारणार आहे. येत्या दोन दिवसात या कामास सुरुवात होईल.
ज्यांच्या संकल्पनेतून हे केअर सेंटर उभारले जाणार आहे, व ज्यांनी बारामतीमध्ये ही संकल्पना यशस्वी केली ते ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर म्हणाले, सुरुवातीस पाच बेड हे ऑक्सिजन व्यवस्था असलेले तर 45 बेड हे आयसोलेशनच्या धर्तीवरील असतील. याठिकाणी संपूर्ण निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. अत्यंत सुटसुटीत पद्धतीने हे कोरोना रुग्णांसाठी असलेले रुग्णालय असेल.










