महान्यूज : आजची गझल
वाचला केवळ नकाशातून रस्ता
एकदा तू बघ जरा चालून रस्ता
कोण दु:खी एवढा येथून गेला
अजुन ओला वाटतो आतून रस्ता
जात असताना तुझ्या दारापुढुन तो
जातसे हळवा किती होऊन रस्ता…
मानतो आनंद की माझा तुझा हा
जोडल्यागत वाटतो लांबून रस्ता
वाटते थंडीतले ते मूल अल्लड
ऊन्ह अंगावर बसे ओढून रस्ता
हरवले मातीत कुठल्या बाल्य माझे
काळ निर्दय टाकतो गाडून रस्ता…
कोठली तू चांदणी झालीस आई
नेमका आहे तिथे कोठून रस्ता ?
गझलकार-शुभानन चिंचकर ‘अरुण’, सासवड
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











