बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी किरकोळ आंदोलन केले तरी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातात, हे योग्य नाही. हे जाणीवपूर्वक होत असेल तर एक लक्षात घ्या, सरकार आज आहे, उद्या नाही. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर याची गंभीर दखल घेतली असून आपणही पक्षाच्या कार्यकर्त्यांंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उंडवडी कडेपठार येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवाकार्य पुस्तिका प्रकाशन व साहित्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील यांच्या कानावर कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती घातली. त्याचा संदर्भ घेत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अप्रत्यक्ष टिका केली.
पाटील म्हणाले, एकतर हे सरकार कोरोनाविरोधात कार्यवाही करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. सध्या या सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, तो म्हणजे विरोधकांना जेरबंद करण्याचा. बारामतीतील कार्यकर्त्यांनी मात्र याचा एकजुटीने सामना करावा . पक्षस्तरावर याचा काही सोक्षमोक्ष लागेलच, मात्र शेतकरीही या सरकारवर नाराज आहेत.
या कार्यक्रमास पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कचरे, प्रशांत सातव, गोविंद देवकाते, सतीश फाळके, प्रविण आटोळे, जी.बी. गावडे, सचिन मलगुंडे, ज्ञानेश्वर माने, प्रविण काळभोर, दादा सातव, पोपटराव खैरे, युवराज तावरे, सुधाकर पांढरे, सुनील माने, धनंजय गवारे, अभिजीत देवकाते, अॅड. जी.के. देशपांडे, भारत देवकाते आदींसह पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











