बँकेत ठेवलेले सोनेही सुरक्षित नाही. कारण सध्या समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बेंगळुरूहून समोर आलेल्या धक्कादायक घटनेने बँकिंग सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
एका बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने ग्राहकांचा विश्वासघात करत तब्बल 2780 ग्रॅम म्हणजेच सुमारे 2.7 किलो सोने लॉकरमधून काढून ते खासगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले आणि 3.5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अधिकाऱ्याने ही रक्कम ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये उधळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गिरिनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र कोट्यवधींच्या सोन्यापैकी मोठा हिस्सा अद्याप जप्त करायचा बाकी आहे.
कसा उघड झाला घोटाळा ?
5 फेब्रुवारी रोजी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता डेप्युटी मॅनेजरने लॉकरमधील सोने काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तूंवर हात घालणे हा त्यांच्या हक्कांचा सरळ उल्लंघन असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्राथमिक तपासात आरोपीने मिळालेली रक्कम ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मवर वापरल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात केवळ आर्थिक फसवणूक नाही तर विश्वासघात आणि गुन्हेगारी हेतूही स्पष्ट दिसून येतो आहे असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत सुमारे 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
खासगी फायनान्स कंपन्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागू शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित सोने सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. तपास अद्याप सुरू असून सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची आणि कागदपत्रांची नियमित तपासणी करावी. बँकेच्या सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ अधिकाऱ्यांना कळवावे असे सांगण्यात आले आहे.











