महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोरोनामुक्तांची संख्या देशात वाढली आहे. आतापर्यंत तब्बल ५६ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यांना कोरोनावर मात केलेले ४० दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत, ते प्लाझ्मा देखील दान करू लागले आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान करणारे व कोरोनावर मात करणारे दोन्हीही सध्या कौतुकास पात्र ठरत आहेत, मात्र अशातच एक नवे निरीक्षण चिंताजनक ठरत आहे. अमेरिकेतील अभ्यासानुसार डेंगीप्रमाणेच कोरोनावर मात केल्यानंतरही काही काळ शरीरात कोरोनाचे विषाणू सक्रीय असतात व त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्ती देखील पुढील काळात कोरोना पसरवू शकते.
अमेरिकेतील नव्या निरीक्षणानुसार कोरोनावर ज्यांनी मात केली, त्यातही ते गंभीर अवस्थेपर्यंत जाऊन आले, अशा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा विषाणू तीन महिन्यांपर्यंत सक्रीय राहतो असे दिसून आले आहे.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (एसडीसीपी) या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार कोरोनातून मुक्त झालेले, परंतू जे गंभीर अवस्थेतून नॉर्मल झाले आहेत, ते संक्रमण झाल्यापासून अगदी तीन महिन्यांपर्यंत इतरांना संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग करू शकतात.
त्यामुळे अमेरिकेत कोरोनामुक्त झालेल्यांना देखील बाहेर न पडण्याचा तसेच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास पूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे भारतातही ५५ लाख जणांनी ही जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.