लातूर : महान्यूज लाईव्ह
लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. “लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील,” या विधानानंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजपविरोधात संतापाची लाट पसरली आहे. रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली असली तरी देखील भाजपचे अगोदर बोलायचे आणि नंतर जन संताप उसळला तर माफी मागायची ही जुनी खोड असल्याने समाजातील नाराजी कायम आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबतच्या या वक्तव्यावर काँग्रेससह विविध स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे. लातूरच्या विकासात विलासराव देशमुख यांचे मोठे योगदान राहिले असल्याने त्यांच्या आठवणी पुसण्याचे वक्तव्य जनभावनांना दुखावणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या वादात अभिनेता व विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर केवळ दोन वाक्यांत ठाम उत्तर दिले. “लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, पण मनावर कोरलेलं नाही,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानावर टीका केली.
रितेश देशमुखांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.











