राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांची दयनीय अवस्था ही आता चिंता आणि संतापाचा विषय ठरली आहे. दौंड तालुक्यातून जाणाऱ्या या पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पालखी सोहळ्यासारख्या शुद्ध भक्ती आणि श्रद्धेच्या यात्रेच्या वाटेवर अशा खड्डेमय अडथळ्यांनी भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर केला आहे. प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी सध्या होत असून पुणे जिल्हाधिकारी व दौंड तहसीलदारांनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तथा पालखी महामार्गावर यवत ते पाटस दरम्यान सेवा रस्ता तसेच मध्य रस्त्यावर दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी मोठे खोल खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचले आहे. या खड्ड्यांमुळे छोट्या अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महामार्गावर पाटस येथे असलेल्या टोल प्लाझा कंपनीकडून टोल वसुली चे काम जोरात सुरू आहे. खड्डेमय झालेल्या रस्त्यांची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही.
नागरिकांच्या तक्रारीकडे ना प्रशासन, ना टोल कंपनी कोणतेही अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २३ जून रोजी दौंड तालुक्यात प्रवेश करणार असून यवत व वरवंड येथे मुक्काम होईल. मात्र अवघ्या काही दिवसांवर सोहळा येऊन ठेपला असतानाही महामार्ग प्रशासन खड्ड्यांबाबत बेफिकीर आहे. पालखी मार्गावरून दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरकडे पायी निघतात, त्यांच्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. तरीही स्थानिक पातळीवर रस्त्यांच्या देखभालीत हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र आहे.
पाटस येथील टोल प्लाझा कंपनी व महामार्ग प्रशासन केवळ वाहनांमधून टोल वसुली करण्यातच व्यस्त असून, महामार्गावरील गंभीर खड्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या टोल कंपनीवर कोणत्याही शासकीय विभागाचे ठोस नियंत्रण नाही, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, हे वास्तव आहे. दरम्यान, यासंदर्भात पाटस येथील टोल प्लाझा कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते संपर्कात आले नाहीत. यामुळे प्रशासनाची व कंपनीची गंभीर उदासीनता उघड झाली आहे.











