बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचा रस्ता हा मुख्यतः वर्दळीचा! पण या रस्त्यावर चारचाकी वाहने स्टंट करु लागली आहेत. काही दिवसांपूर्वीच बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी दोन वाहनांवर कारवाई केली होती. आता मात्र हद्द झाली. रात्रीच्या वेळी रस्त्यात स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकले म्हणून बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना बारामतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष दत्तू कांबळे असे या जखमी पोलीस हवालदाराचे नाव असून सध्या त्यांच्यावर बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 29 मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. कांबळे यांना रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे चालक पोलीस शिपाई तरंगे यांचा फोन आला की, ऐश्वर्या बेकरीच्या समोरच्या बाजूला रस्त्यावर काळ्या रंगाची आणि दोन्ही बाजूला नंबर नसलेली हुंडाई वेर्ना चारचाकी गाडी घेऊन गाडीचा चालक हा रस्त्यावर स्टंट करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस ठाण्यातील शासकीय वाहन घेऊन कांबळे हे त्या ठिकाणी पोचले. तेव्हा ही गाडी विद्या प्रतिष्ठानकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी लावली होती. कांबळे हे गरुड आणि श्री तरंगे यांच्यासमवेत त्या ठिकाणी पोचले. तिघांनीही गाडीची पाहणी केली. तेव्हा गाडी लॉक केली होती. ही गाडी कोणाची आहे? ही चौकशी करत असताना 21 वर्षाचा युवक या तिघांजवळ आला. त्याने नाव सांगितले नाही, मात्र जेव्हा कांबळे यांनी स्टंट करून नागरिकांच्या जीविताशी असा का खेळ करत आहेस? अशी विचारणा केली तेव्हा त्याने मी तुला ओळखत नाही असे म्हणत अरेरावीची भाषा सुरू केली.
त्यानंतर ही चारचाकी गाडी रहदारीस अडचण होत असल्याने बाजूला घे, अथवा पोलीस ठाण्यात चल असे असे सांगत गाडी बाजूला घेतली नाही तर नाईलाजास्तव तुझ्या गाडीला क्रेन लावून जागेवरून काढावी लागेल असे सांगत तरंगे यांनी क्रेनची गाडी बोलवली. तेव्हा या युवकाने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. माझ्या नादी लागला, तर एकाएकाला गाडीखाली घेऊन जीव घालवेल असे सांगत त्याने अचानक ड्रायव्हर सीटवर बसून गाडी सुरू केली आणि जोरात रिव्हर्स गिअर घेऊन उजव्या बाजूच्या डिकीने कांबळे यांना जोरदार धडक दिली.
त्यानंतर पहिल्यांदा तुझा जीव घेतो असे म्हणत त्याने जोराची धडक दिली. कांबळे हे डोक्यावर पाठीमागच्या बाजूस पडले आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. कांबळे यांच्यासोबत असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या ताब्यातील हुंडाई गाडीने समोरच्या बाजूवर याच पोलिसांच्या अंगावर ही गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि तो तिथून जोरात गाडी चालवत निघून गेला.
या घटनेनंतर कांबळे यांना तातडीने बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बारामतीतील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 115(2), 121(2), 132, 351(2), 351(3) व 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे तर धक्कादायकच..
दरम्यान या घटनेची एवढी गुप्तता का पाळली गेली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले व त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या घटनांचा अपवाद वगळता तालुका अथवा गावच्या भागात अशा घटना घडलेल्या नाहीत. मात्र बारामतीमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून, गुन्हेगारांना सामान्यांचा तर नाहीच नाही पण कायद्याचा अजिबातच धाक उरला नाही का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.











