दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरफोडी आणि दुकाने फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यवत व पाटस पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवावी तसेच चोरांना पकडण्याची मोहीम तीव्र करण्याची मागणी ग्रामस्थांनी करीत आहेत.
यवत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील पाटस कुसेगाव, कानगाव, रोटी, हिंगणी गाडा, देऊळगाव गाडा, वरवंड आदी गावांमध्ये रात्रीच्या सुमारास घरफोडी व चोरीचे प्रकार वाढले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि विज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने तसेच उष्णतेमुळे नागरिक रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर अथवा घराच्या छतावर झोपत आहेत.
त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत. तर अनेक ठिकाणी चोरट्यांनी नागरिकांना मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत. काही ठिकाणी व्यवसायिकांची दुकाने फोडुन दुकानांमधील वस्तूंची साहित्यांची चोरी केल्याच्या घटनाही घडत आहेत. गावठाण आणि वाड्यास्त्यांवर चोरट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हे चोरटे आलिशान गाड्यांमध्ये येत असल्याचे काही नागरिकांनी पाहीले असून, या टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे नागरिकाकडून सांगितले जात आहे. तसेच या चोरट्यांकडून नागरिकांना धारदार हत्याराची भीती दाखवत लुटले जात आहे . नागरिकांना चोरट्यांच्या भीतीमुळे रात्रभर जागून त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. या चोरांच्या टोळ्यांमध्ये नेमके किती जण आहेत, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष घालून पोलीस मित्र मंडळ तसेच दक्षता कमिटी नेमून रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी मागणी अनेक गावातील नागरिक करीत आहेत.
दरम्यान, या संदर्भात पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख म्हणाले की, परिसरात चोरीच्या घटना घडतात, हे खरं आहे, मात्र पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवली आहे. पाटस, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा या भागात पोलिस रात्रीच्या वेळी तीन ते चार वेळा गस्त घालत आहेत. नागरिकांनीही रात्रीच्या वेळी आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, घराचे दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात, काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी अनोळखी व संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पाटस पोलिसांची संपर्क साधावा.