मुंबई – महान्यूज लाईव्ह
तब्बल 4 महिने झेड प्लस सुरक्षा घेऊन सगळ्या यंत्रणांना फेल ठरवणारा एक गुजराती आज सकाळपासून देशात चर्चेचा विषय ठरला आहे. नाव आहे.. किरण पटेल.. मूळचा गुजरातचा.. नुकतीच याला अटक झालीय. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
किरण पटेल याला चार महिने झेड प्लस सुरक्षा पुरवली, त्यानेही झोकात अनेक उच्चस्तरीय बैठकादेखील घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या पदावर आपण कार्यरत असल्याचं सांगून याने जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या चोख बंदोबस्तात पिकनिकचा अनुभव घेतला.
जम्मू काश्मीरमधील अशा ठिकाणी, जिथे सामान्य माणूस सहजासहजी फिरू शकत नाही, अशा संवेदनशील भागात झेड प्लस सुरक्षा घेऊन किरण पटेल हा त्याच्या पत्नीसह मनसोक्त फिरला. कडेकोट सुरक्षेच्या ताफ्यात हा पटेल जम्मू काश्मीरमधील अनेक ठिकाणे मनसोक्त फिरला. अगदी व्हॅलेन्टाईन डे ला देखील पत्नीसह त्याने पिकनिक केली.
पण चार महिने या माणसाची खरी ओळख देशातील सर्वोच्च सुरक्षा यंत्रणेलाही कळली नाही. साधी भनकदेखील लागली नाही, याला काय म्हणायचे? गंमत म्हणजे सारे नियम, शिष्टाचार गुंडाळून सुरक्षा यंत्रणा व स्थानिक प्रशासन यंत्रणा या भामट्याला साऱ्या सोयीसुविधा पुरवत होती.
द ललित हे हॉटेल किती उच्चभ्रू आहे हे जम्मू काश्मिरमध्ये जाऊन आलेल्या अनेकांना चांगलेच माहिती आहे. मात्र तब्बल चार महिने या हॉटेलमध्ये राहून किरण पटेल याने अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकादेखील घेतल्या. तब्बल चार महिन्यांनंतर तो तोतया अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला अटक झाली.
देशाची सुरक्षा व्यवस्था किती पोकळ आहे याचा हा नमुना आहे. पंतप्रधान कार्यालयात कामाला आहे, म्हटल्यावर त्याला विचारायचंच नाही हा कुठला नियम? विशेष म्हणजे याचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड असून हजारो फॉलोअर्स त्याला आहेत.
ऑक्टोबर २०२२ पासून तो काश्मिर खोऱ्यात सातत्याने दौरे करीत होता. ३ मार्च २०२३ रोजी त्याला अटक करण्यात आली. पण त्याची ही माहिती प्रसारमाध्यमांपासून लपविण्यात आली.
१६ मार्च २०२२ रोजी म्हणजे काल त्याला श्रीनगर कोर्टात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आणि मग ही बातमी सर्वांना समजली. पंतप्रधान कार्यालयातील रणनिती व मोहिम या विभागाचा अतिरिक्त संचालक असल्याचे हा किरण पटेल सांगत होता. या ठगाचा वेळीच शोध का घेतला नाही म्हणून काश्मिरच्या पोलिस विभागातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तोपर्यंत बूंदसे गयी सो हौदसे नही आती या म्हणीपर्यंत प्रवास येऊन ठेपला.