दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई एमआयडीसीतील पथदिव्यांचे १५ लाख रुपयांचे वीजबील थकल्याने पदपथावरील पथदिवे बंद असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात गेली अनेक दिवस हे दिवे बंद असल्याने उद्योगक्षेत्रातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दरम्यान महावितरणने वाई एमआयडीसी कार्यालयास थकीत वीजबिल तातडीने भरावे अन्यथा कोणत्याही क्षणी पथदिव्यांसाठी बसवलेले वीजेचे मीटर काढण्यात येतील असा इशारा नोटीसीच्या माध्यमातून १० मार्च रोजी दिल्याचीही चर्चा आहे.
पथदिवे सुरू नसल्याने रात्रपाळीसाठी येणाऱ्या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. वाई एमआयडीसीतील या कमतरतेची दखल कोल्हापूरमधील राज्य ओद्योगिक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी येथील कामगारांची मागणी आहे.
वाईतील एमआयडीसीमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातूनही कामगार येतात. यामध्ये महिलांचाही समावेश असतो. तीन पाळ्यांमध्ये काम चालत असल्याने एमआयडीसी परिसरातील पथदिवे सुरू असणे महत्वाचे आहे. एखादी अप्रिय घटना घडून येथील सुरक्षेचे तीनतेरा वाजण्यापूर्वीच या प्रश्नावर गांभिर्याने दखल घ्यावी अशी कामगारांची मागणी आहे.