आयुष प्रसाद यांची इंदापूर पंचायत समिती ला भेट..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी इंदापूर येथे पंचायत समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यात ३० गावात एक हजार पेक्षा जास्त घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. ही अपूर्ण असणारी घरकुले ३१ मार्च २०२३ पर्यंत पुर्ण करुन घेण्यात यावीत, अशा सुचना दिली.
डॉ.आयुष प्रसाद यांनी इंदापूर येथे पंचायत समिती ला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील घरकुलांचा कामाचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)तेजस जगताप, ग्रामीण घरकुल अभियंते, ३० गावांचे सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक उपस्थित होते.
तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीमध्ये १००० पेक्षा जास्त घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत.त्या घरकुलांना लागणारे वीट, सिमेंट,वाळू इत्यादी साहित्य तसेच कामगार यांचे नियोजन करावे.८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी 1000 घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा घेण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले.
पहिला हप्ता घेऊनही घराचे बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांना बांधकाम कंत्राटदाराकडून जेसीबीने पाया खोदाई करुन घ्यावी. तसेच अपूर्ण घरकुलांच्या लाभार्थ्यांचे ग्रामपंचायतीमध्ये मेळावे घेऊन त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. अडचणी सोडविण्यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पुढाकार घ्यावा अशा सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी दिल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.