मित्रासाठी अभिजीत पाटलांची धावाधाव, एअर अॅम्ब्युलन्सने सोलापुरातून थेट मुंबईला हलवलं
सोलापूर – महान्य़ूज लाईव्ह
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व संचालकाच्या मैत्रीची सध्या सोशल मिडियातही चर्चा आहे. कारखान्याच्या अध्यक्षाने संचालक मित्रासाठी केलेली मदतीची धावाधाव ही या चर्चेचा विषय आहे.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आपला मित्र अत्यवस्थ झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी कोणतीही हयगय व वेळ न दवडता थेट मुंबईहून एअर अॅम्ब्युलन्स बोलावली व मुंबईत उपचाराचा निर्णय घेतला.
याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला असून सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटलपासून विमानतळावर व विमानतळावरून थेट मुंबईचा हा प्रवास सध्या जनमाणसातही चर्चेचा विषय बनला आहे.
पंढरपूर तालुक्यातील जळोली गावचे सुपूत्र व विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे हे अभिजीत पाटील यांचे मित्र आहेत. नरसाळे यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी विविध तपासण्या करीत एक छोटी शस्त्रक्रियाही केली, मात्र तरीही प्रकृतीत फरक पडत नव्हता.
उलट शस्त्रक्रियेनंतर पोटात जंतूसंसर्ग वाढू लागल्याने अभिजीत पाटील यांनी वेळ न दवडता निर्णय घेतला आणि मुंबईला हलविण्याचे ठरवले. त्यांनी मुबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार स्वतःच निर्णय घेत मुंबईतून एअर अॅम्ब्युलन्स मागवली.
आणि दत्तात्रेय नरसाळे यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमधून सोमवारी दुपारी ४ वाजता एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथे दाखल केले. अभिजीत पाटील यासंदर्भात सोशल मिडीयावर पोस्ट करून म्हणाले, ‘मित्रासाठी कोणतंही दिव्य पार करू, मात्र मित्राचा जीव वाचला पाहिजे. त्याला उत्तम स्वास्थ्य लाभलेच पाहिजे. उपचार सुरू केले आहेत. ते लवकर आजारातून बरे होतील हा विश्वास वाटतो,’