राज्यातील २२ हजार ६८० संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या
बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारने राज्यात सुरू असलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे कारण पुढे करीत राज्यातील 22680 सहकारी संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये जिल्हा बॅंकेपासून अ.ब.क व ड प्रवर्गातील 250 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या संस्थांचा समावेश असून 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या संस्थांच्या निवडणूका 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.
आज सहकार खात्याचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी हा आदेश राज्यातील सहकार आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना लागू केला आहे. त्यानुसार राज्यातील गृहनिर्माण संस्था, सहकारी बॅंका, सहकारी सोसायट्यांसह ज्या 22 हजार 680 सहकारी संस्थांच्या या महिन्यापासून निवडणूका जाहीर होणार होत्या, त्या आता पुढे ढकलण्या तआल्या आहेत. साहजिकच राज्यातील 60 हून अधिक साखर कारखान्यांच्याही निवडणूका पुढे ढकलल्या जाणार आहेत.
राज्यातील सध्या ज्या सहकारी संस्थांची निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरू आहे, त्या संस्था यातून वगळल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू असून तिची प्रक्रिया सुरू राहणार आहे, मात्र होणाऱ्या व अगदी जाहीर झालेल्या निवडणूका मात्र या आदेशामुळे तूर्तास रद्द झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याचाही समावेश आहे. या आदेशानुसार राज्यातील अ,ब, क व ड प्रवर्गात असलेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका 27 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्यात सध्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरू आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सहकार विभागातील बहुतेक अधिकारी योजनेच्या अंमलबजावणीत व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही.
सकाळी निवडणूक जाहीर, दुपारी स्थगित! सोमेश्र्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक आज सकाळी जाहीर झाली आणि कारखाना परिसरात इच्छुकांची गर्दी झाली, मात्र दुपारीच आलेल्या अध्यादेशाने इच्छुकांची पंचाईत तर झालीच, शिवाय सकाळी निवडणूक जाहीर व दुपारी स्थगित अशा दोन सरकारी आदेशांमुळे परिसरात व कार्यक्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली.










