बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच रक्तदात्यांनी रक्तपेढीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन बारामतीतील स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते. मात्र नागरिकांनी कोरोनाची भीती मनात बाळगल्याने रक्त संकलन करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. रक्त संकलन होत नसल्या कारणाने बारामतीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे.
सध्या बारामती परिसरातील रुग्णालयांमध्ये डेंगू सदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्या रुग्णासाठी लागणाऱ्या प्लेटलेटसचीही मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी मागणी आहे. मात्र रक्ताचा तुटवडा असल्याने, ब्लड बँकेत सध्या प्लेटलेट उपलब्ध नाहीत. रक्तदान झाल्यास त्या गरजू रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देता येतील.
रक्तदान केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा कोणताही धोका होणार नसून इच्छुक रक्तदात्यांनी आणि शिबीर आयोजकांनी येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांना 9096383959 यावर संपर्क करून पाच-पाचच्या गटाने रक्तदान करावे जेणे करून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे सोपे होईल असेही आवाहन डॉ. दोशी यांनी केले आहे.











