महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील कृष्णा नदीला महापूर आला असून या वर्षीच्या नियोजनामुळे अजून तरी सांगली कोल्हापूर मध्ये गेल्यावर्षीप्रमाणे प्रलय आलेला नाही. मात्र एक गोष्ट अत्यंत दिलाशाची की, या सर्व गडबडीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत आटपाडी तालुक्यात सह 236 गावांना दिलासा देत तलाव भरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, हे गेल्या 18 वर्षात तेथील लोकांनी, शेतकऱ्यांनी पाहिलेले एक स्वप्न साकार होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे असे समजायला हरकत नाही.
2004 मध्ये कृष्णा नीरा भीमा जल स्थिरीकरणाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला होता, ज्यातून बारमाही दुष्काळी सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांसह मराठवाड्याला पाणी पुरवण्याचा उद्देश होता. 105 टीएमसी पाणी, जे पावसाळ्याच्या काळात महापुरामध्ये वाहून जाते ते, पाणी स्थिर करण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी व शेतीसाठी महत्वाचा निर्णय होता. यामध्ये टेंभू, ताकारी, म्हैसाळ या पाणी योजनांसह वारणा, कृष्णा नीरा-भीमा या नद्यांमधील पाणी एकमेकांच्या नद्यांमध्ये वळवण्याचा हा एक अफलातून प्रयत्न आखण्यात आला. काळाच्या ओघात जसजशी याची खर्चाची रक्कम वाढत गेली, तसा हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. सध्या नीरा-भीमा जलस्थिरीकरणाचा टप्पा सुरू असून त्यातील इंदापूर तालुक्यातील बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशा स्थितीत म्हैसाळ पाणी योजना सुरू करून जत, आटपाडी सह सांगली जिल्ह्यातील तलाव भरून काढण्यासाठी कृष्णाच्या पुरातील पाणी वापरले जात असेल तर हा देखील एक तेथील शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण आहे.











