बारामती : महान्यूज लाईव्ह
मागील काही वर्षात मोबाईलवरून संपर्क साधून तुमच्या बँकेच्या एटीएम कार्ड वरील पिनकोड कार्ड नंबर घेऊन तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम लंपास करणारा किंवा तुम्हाला काही लाख डॉलरची लॉटरी लागली आहे म्हणून ई-मेलद्वारे फसवणारा नायजेरियन फ्रॉड अनेकांना माहित झाला आहे.. मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून बारामती इंदापूर व आसपासच्या काही तालुक्यांमधील फेसबूक धारकांना वेगळ्याच गोष्टीने चिंतेमध्ये टाकले आहे… जामतारा सारखा एक प्रकार फेसबुक मध्ये घडतोय.. ज्यातून फेसबुकचे अकाऊंट हॅक करून फेसबुक फ्रेंड्स ला पैसे मागितले जात आहेत तेव्हा सावधान तुमचेही फेसबुक अकाउंट हॅक होऊ शकते…
गेल्या आठवड्यापासून काही जणांचे फेसबुक अकाउंट हॅक होत आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच बारामतीतील एका प्रथितयश डॉक्टरांना असाच एक अनुभव आला आहे, तर बारामतीत जाहिरात व्यवसायात कार्यरत असलेल्या एका प्रतिनिधीचे फेसबुक अकाउंट काल रात्री हॅक करण्यात आले व या अकाउंट वरून त्याच्या अनेक मित्रांना फोन पे, गुगल पे वरून काही पैसे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. यासंदर्भात संबंधित प्रतिनिधीने बारामती पोलिसांकडे तक्रार केली आहे, परंतु जामतारा सारखा फेसबुक मध्ये आर्थिक फसवणुकीचा असलेला हा प्रकार एकदम नवा असल्याने यास अनेक जण फसण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोनाचा काळ असल्याने व अनेक जण बेरोजगार झाले असल्याने अनेकांना या काळात पैशाची चणचण भासू शकते अशा प्रकारचा भ्रम मित्रांचा होऊ शकतो व यातून अनेक जण फसवले जाऊ शकतात. त्यामुळे यापुढील काळात फेसबुक वरून कोणी चॅटिंग करून पैशाची मागणी करत असेल तर अशावेळी आपल्या फेसबुकधारक मित्रांना थेट फोनवरून संपर्क साधून माहिती द्यावी तसेच खरोखरच पैशाची गरज आहे की नाही याची खात्री करावी, अन्यथा मैत्रीच्या नावाखाली तुम्ही फसवले जाऊ शकता.










