दौंड : महान्युज लाईव्ह
चौफुला – सुपा अष्टविनायक रस्त्यावर देऊळगाव गाडा हद्दीत मालवाहतूक गाडीला अडवून वाहनचालकाला दमदाटी व धमकी देऊन २५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या चारपैकी एका बोगस पोलीसाला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले.
पकडलेल्या तोतया पोलिसाला पाटस पोलिसांच्या ताब्यात दिले असून चार जणांवर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार सागर चव्हाण यांनी दिली.
हुसेन जानसा इराणी (राहणार शिवाजीनगर पुणे ) असे पकडलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी ( दि.९) गणेशलाल लाधुलाल नायक (वय ३५ राहणार रघुनाथपूर, राजस्थान) हा ट्रक क्रमांक (आर जे ०९/जी डी ३५८३ ) या मालवाहतूक वाहनांमधून विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली येथून ट्रक मध्ये साखर भरून राजस्थानकडे निरा ते शिरूर रोडने शिरूर बाजूकडून मोरगाव- सुपा – चौफुला- शिरूर या मार्गावरून जात होता.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा हद्दीत डेंबळरकर वस्ती येथे ट्रक आला असता, पाठीमागून सुपा बाजूकडून दोन मोटरसायकल वरुन चार व्यक्तींनी मालवाहतूक ट्रकला मोटरसायकल आडवी मारून ट्रक थांबवला. आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीमध्ये गांजा व अफीम आहे. आम्ही चेक करणार आहोत असे सांगून त्यातील काळे रंगाच्या रेनकोट घातलेला एक जण ट्रकमध्ये चढुन गाडीची तपासणी केली.
मात्र गाडीत काहीच मिळाले नाही. तरीही आम्ही पोलीस आहोत, २५ हजार रुपये द्या. नाहीतर तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ आणि गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली. त्यावेळी रोडने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनांमधील ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवली.
काय झाले विचारले असता आम्ही पोलीस आहोत, गाडी चेक करत आहोत असे सांगितले असता, त्यांना ओळखपत्र मागितले. तेव्हा या चौघांनी तिथून पळ काढला. प्रमोद वामन गायकवाड, अभिजीत राजेंद्र शितोळे ,अरविंद अशोक बारवकर, स्वप्नील बाळासाहेब रासकर आदींसह वाहनचालकाने त्यांचा पाठलाग केला.
या पाठलागावर चार पैकी एकाला पकडण्यात यश आले तर तिघेजण पळून जाण्यास यशस्वी झाले. पकडलेल्या व्यक्तीला पाटस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत वाहन चालक गणेशलाल लाधुलाल नायक यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने हुसेन इराणी व अनोळखी तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सागर चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.