बारामती : महान्यूज लाईव्ह
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची अयोध्या यात्रा काही काळासाठी चुकली असली, तरी याच दरम्यान राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, बारामतीच्या ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार व रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार यांनी उत्तर भारतातील धार्मिक स्थळांचा दौरा केला. तेथून आणलेले गंगाजल आता महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळांमध्ये पाठवले जाणार असून याद्वारे अभिषेक केला जाणार आहे.
आज बुधवारी (ता. 15) रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत येथून या गंगाजल यात्रेची सुरुवात झाली. राज्यातील विविध प्रमुख धार्मिक स्थळांच्या ठिकाणी हे गंगाजल नेण्यात येणार असून त्याठिकाणी अभिषेक घालण्यात येणार आहे. यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मध्यंतरी आमदार रोहित पवार यांनी वाराणसी आणि इतर धार्मिक स्थळांचा दौरा केला. यामध्ये वाराणसी दौऱ्यात अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या वाराणसीच्या काशिविश्वेश्वराची पूजा केली आणि गंगाआरती करून तेथून गंगाजल आणले.