महान्यूज : आजची गझल
अंदाज सांगतो आहे, हा माझा दावा नाही
मृत्यू अनवाणी येतो, वाजवत खडावा नाही
या असण्यावरचा आता विश्वास उडाला आहे
देहाशिवाय कुठलाही, हातात पुरावा नाही
उत्तरे शोधण्यासाठी ही वणवण जन्मभराची
पण प्रश्न कोणता होता, याचाच सुगावा नाही
हा योगायोग म्हणावा, की वैर असावे त्यांचे
गुलमोहरल्या रस्त्यावर, एकही बहावा नाही
का वाढत नाही कळले, हे प्रेम आपल्यामधले
वेदने, क्षणाचासुद्धा, अपुल्यात दुरावा नाही
माझ्यात नको येऊ तू, बाहेरच भेटू कविते
बाहेर रंगल्या भिंतीं, आतून गिलावा नाही
तू थांब जरासा हृदया, अन श्वास टाक थोडासा
सुरुवातीपासून बघतो, अगदीच विसावा नाही
गझलकार : सदानंद बेंद्रे ‘मुसाफिर’
परीचय :
नाव : सदानंद गोपाळ बेंद्रे
जन्मतारीख : १५ डिसेंबर१९६५
पत्ता : ३०१, मानसी कॉम्प्लेक्स, साईकृपा कॉम्प्लेक्स, काशिमिरा, मीरा रोड पूर्व,
ठाणे ४०११०४
मोबाईल : ९३२३५०१२९६
ईमेल : bendres11@gmail.com
शिक्षण : वाणिज्यशाखा पदवीधर
व्यवसाय : जाहिरातींसाठी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये लेखन, आणि याच भाषांमध्ये पुस्तकांचे व इतर साहित्याचे अनुवाद
छंद, आवडी : वाचन आणि संगीत
साहित्य क्षेत्रातली वाटचाल :
व्यक्तिगत ब्लॉगवर मराठी आणि इंग्लिश लेखन
दैनिक सामनाच्या फुलोरा या कॉलममध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित लेखमाला. १२ लेख प्रसिद्ध
दिवाळी अंकांमध्ये लेख, कविता प्रसिद्ध.
मराठी गझल क्षेत्रात २०१२ साली पदार्पण
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ६०/७० गझल मुशायरे व कवितावाचनाच्या कार्यक्रमात सहभाग.
गोव्यात काव्यहोत्र २०१६ मध्ये सहभाग
मराठी साहित्य संमेलन २०१७ डोंबिवली येथे गझल मुशायाऱ्यात सहभाग
यूआरएल फौंडेशनचा ‘गझल उन्मेष २०१७’ हा पुरस्कार
‘पार्कातल्या कविता’ या सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. आजवर ४३ कार्यक्रम.
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड












great