युवराज जाधव, महान्यूज लाईव्ह
सांगली : कोविड या रोगाच्या फैलावामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. या मध्ये नेहमीच या ना त्या कारणाने संकटाच्या फेऱ्यात अडकलेला शेती व्यवसाय सुद्धा सुटला नाही. अत्यावशक सेवा या शीर्षकाखाली शेतीतील कामे सुरु राहिली, पण शेती उत्पादनाच्या विपणनास असलेले सौदे बाजार मात्र बंद होते. परिणामी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल मात्र पडून राहू लागला. भाजीपाल्यासारखा नाशवंत माल तर यामुळे सडून जावू लागला. पण नेहमीच संकटावर मात करत नवा मार्ग शोधणाऱ्या बळीराजाला ह्या लॉक डाऊन ने दिले बांधावरचे आणि रस्त्यावरचे खात्रीशीर मार्केट..! तासगाव सांगली या रोडवर विविध ठिकाणी बांधावर असणाऱ्या या भाजीपाला विक्री केंद्राच्या संदर्भाने बांधावरचे मार्केट हि संकल्पना समजावून घेऊया.
काय आहे बांधावरचे मार्केट ?
उत्पादित केलला माल सडून जाऊ नये म्हणून काही शेतकऱ्यानी त्याचे विपणन, बांधावरच करावयाचे ठरवले. यातून शेतात उत्पादित झालेला गवारी,भेंडी,काकडी, वांगी, मिरची तसेच भाजीपाला व गावरान अंडी यासारखा ताजा माल ग्राहकांना शेतकऱ्याच्या बांधावरच मिळू लागला. या संकल्पनेचा प्रतिसाद वाढल्याने सुरु झाल बांधावरच मार्केट.
कंपनी आउटलेट सारखा दर कमी-
उत्पादित केलेला विक्रीयोग्य माल कंपनीच्या आउटलेट मध्ये कमी दरात देण्याचा प्रघात सध्या आहे. शोरूम पर्यंत नेण्याचा वाचलेला प्रवास खर्च, वेगवेगळे कमिशन याला फाटा देत “थेट कंपनी ते ग्राहक” हा विपनणाचा नवा आयाम समोर आला आहे. आगदी त्याचेच अनुकरण होत लॉक डाऊन ने दिलेल्या बांधावरच्या मार्केट मध्ये देखील फळभाज्या आणि पालेभाज्या यांचे दर इतर मार्केट च्या तुलनेत कमी आहेत. साहजिकच वाचलेला वाहतूक खर्च, आडते आणि बागवान यांचे वाचलेले कमिशन यामुळे हा दर कमी होण्यास मदत होते व त्याचा फायदा थेट ग्राहकाना होतो.
गृहिणींना जोड व्यवसाय:
लॉक डाऊन च्या काळात सार जग ठप्प झाल्याने रोजगार देखील मिळेनासे झाले. परिणामी कुटुंबातील सर्वच घटकांना जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे. आज ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील गृहिणींना लॉक डाऊन मध्ये बांधावरच्या मार्केट मधून जोड व्यवसाय निर्माण झाला आहे. उत्पादित झालेला माल योग्य निगा राखत ग्राहकाना देण्यात त्यांचा वाटा देखील महत्वपूर्ण आहे. या बांधावरच्या मार्केट मधून आज त्यांचं पाऊल आर्थिक स्वयंपूर्णतेकडे पडताना दिसत आहे.
आठवडी नव्हे तर आता रोजचाच बाजार:
कोरोणा या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रा पासूनखेड्या पर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागल्या. गर्दीचे प्रसंग निर्माण होऊ नयेत म्हणून खेडोपाडी होणारे आठवडी बाजार बंद झाले. काही शेतकरी या बाजाराच्या माध्यमातून आपला शेतमाल विक्री करून उदरनिर्वाह कारायचे, त्यांच्या साठी बांधावरच मार्केट हा नवा पर्याय खुला झाला.
गावरान अंडी विक्री साठी तीन आठवडी बाजार फिराव लागत आसे परंतु आठवडी बाजार बंद झाल्याने संसार कसा चालवायचा याचे टेन्शन होते. आता या संकल्पनेमुळे रोज तेवढीच विक्री होत असून आता हा आठवडी नव्हे तर आता रोजचाच बाजार वाटत आहे – निशा अंबादास आनंदे
फ्रेश भाजीपाला व आर्थिक बचत:
लॉक डाऊन मुळे प्रत्येकाचेच आर्थिक बजेट विस्कटले आहे. या कालावधीत शहरात येणारा एखादा भाजीपाला व्यावसायिक आणि त्याच्याकडे असणारी प्रचंड मागणी यामुळे भाव गगनाला भिडले होते. पर्याय म्हणून कडधाण्य हा सोयीचा मार्ग वाटत होता पण किती दिवस ? असा प्रश्न निर्माण होत होता. “बांधावरच्या मार्केट मधून आपण जाता येता कधीही भाजी खरेदी करू शकतो ते ही आपल्या बजेट मध्ये..! याचा अनुभव आल्यानंतर ऑफिसला जाताना किंवा येताना हे काम आगदी सहज शक्य झाले आहे.
शहरात किंवा इतर ठिकाणी असलेली गर्दी टाळून आपण या ठिकाणी सर्व नियम पाळत खरेदी करू शकतो त्यामुळे साहजिकच फ्रेश भाजी आणि आर्थिक बचत या दोन्हींचा समन्वय या मार्केट मध्ये अनुभवता आला – दिलीप पाटील, ग्राहक
बांधावरचे मार्केट कायमस्वरूपी रहावं –
बांधावरच मार्केट या लेखाचे संदर्भ जमवत आसताना विक्रेत्या शेतकऱ्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी आता जरी हा प्रयोग यशस्वी होत असला तरी लॉक डाऊन नंतर या संकल्पनेवर सरकारी नियमांखाली बंधने लादली जाऊ नयेत. हे मार्केट असेच रहावे या मुळे आमच्यासारख्या शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न मार्गी लागतील अशी मते शेतकऱ्यांनी व्यक्त केली.










