बारामती : महान्यूज लाईव्ह
उद्या आयोध्येत श्री राम मंदिराचे भूमीपूजन होत आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण होवू नये, समाजात संभ्रम निर्माण होवू नये या उद्देशाने बारामती पोलिसांनी सोशल मिडिया वापरणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारचे तेढ निर्माण होईल असे साहित्य अथवा पोस्ट व्हायरल न करण्याची सूचना देण्यात आली असून असे आढळल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रूप ॲडमिनवरही गुन्हा दाखल करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.
उद्या ५ ऑगस्ट रोजी आयोध्येत श्री राम मंदिराचा पायाभरणी समारंभ होत आहे. या अनुषंगाने पोलिसांनी सोशल मिडियावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पायाभरणी समारंभाच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण होतील किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा स्वरूपाचे मेसेज, चलचित्र किंवा साहित्य पाठवल्यास कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.
जातीय वैमनस्य, धार्मिक तेढ, समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या अनधिकृत, खोट्या बातम्या प्रसारीत होणार नाहीत याची काळजी सोशल मिडिया वापरणाऱ्यांनी घ्यायची आहे. अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रूप ॲडमिनवर भादंवि कलम ६८ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील असेही शिरगावकर यांनी सांगितले.










