बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामती तालुक्यात दिवसभरात जण कोरोनाबाधित झाले. सकाळी तीन जण कोरोनाबाधित आले होते, त्यानंतर उर्वरित चार नमु्न्यांची प्रतिक्षा होती. त्यामध्ये तीन निगेटिव्ह आले आहेत, तर एका अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान बारामती शहरातील आमराईत एकास नव्याने कोरोनाची लागण झाली आहे.
बारामतीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा होता, काही प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांचीही तपासणी काल झाली होती, त्यांचा अहवाल आज येणार होता. या पदाधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांसाठी तो एक दिलासा ठरला आहे.
बारामतीत काल तीन जण कोरोनाबाधित आढळले होते. तर तत्पूर्वी २७ जुलै रोजी बारामतीत ७ जण एकाच दिवसात कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील ५३ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी ४६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तीन जण कोरोनाबाधित आढळले. तर चार जणांचा अहवाल प्रतिक्षेत होता. त्यातील आता तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरीत एकजण पॉझिटिव्ह आला आहे. बारामती शहरातील आमराई येथील या रुग्णावर शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आता बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या १२८ झालेली आहे, त्यामधील ६२ रुग्ण बरे झालेले आहेत व ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. बारामतीत आजवर एकूण ११ जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत.










