शिरूर : महान्यूज लाईव्ह
गेले दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे कुस्तीचे आखाडे अन् मैदाने सूनेसूने पडले होते. मात्र यंदा प्रथमच कुस्तीच्या आखाड्यात मल्लांचा आवाज घुमु लागला असून निमोणे येथे यात्रेत शांततेत यात्रेतील कुस्ती आखाडा पार पडला. यात्रा उत्सव शांततेत पार पडला असल्याची माहिती सरपंच शाम काळे यांनी दिली.
निमोणे (ता.शिरूर) गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचा वार्षिक यात्रा महोत्सव बुधवार दि.१६ व गुरुवार दि.१७ या दरम्यान संपन्न झाला.त्यानिमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. बुधवार दि. १६ रोजी सकाळी श्रींचा अभिषेक, महापूजा,तर सायंकाळी ग्रामप्रदक्षिणा तसेच देवाचा रथ ओढण्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी भाविकांनी “यळकोट यळकोट जय मल्हार”च्या जयघोषात भंडारा- खोबऱ्याची उधळण केली. यावेळी प्रथमच डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. तर रात्री कमल वनिताराणी कराडकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
गुरुवारी सकाळी तमाशाची पारंपारिक हजेरी,सायंकाळी निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न झाला. यावेळी तब्बल ३०० लहान मोठ्या मल्लांनी आपला सहभाग नोंदवला. मल्लांना रोख इनाम तसेच निकाली कुस्त्यांच्या विजेत्यांना वस्ताद कै. गेणभाऊ एलभर व महाराष्ट्र चॅम्पीयन कै. संतोष एलभर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी न्हावरा – शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांनी आपल्या निधितुन कुस्त्यांचा आखाडा बांधण्यासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सरपंच शामकांत काळे, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष शांतीलाल होळकर, उपमहाराष्ट्र केसरी सचिन एलभर, आनंदराव ढोरजकर, सुभाष गव्हाणे, संजय काळे, संतोष जाधव, श्यामकांत ढोरजकर, अतुल दुर्गे, भाऊसाहेब काळे यांसह कुस्ती शौकिन मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
यावेळी पंच म्हणुन वस्ताद अशोक थोरात, ज्ञानदेव काळे, जितेंद्र काळे, शशिकांत काळे, नारायण काळे यांनी काम पाहिले. आबा निम्हण व अमोल थोरात यांच्या बहारदार निवेदनाने आखाड्याची रंगत वाढविली. ‘दौलत महाराष्ट्राची ‘ या मराठी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाने यात्रा महोत्सवाची सांगता झाली.











