सोमेश्वरनगर : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर आणि तालुक्यात आज नव्याने पाच जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये तालुक्यातील वाणेवाडी येथील एका ३४ वर्षीय महिलेचा समावेश असल्याने सोमेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित महिला वाणेवाडीतील असली तरी, प्रत्यक्षात ती हडपसर येथील असून सध्या ती आपल्या माहेरी बारामती शहरातील जळोची येथे वास्तव्यास असल्याची माहिती पुढे आली आहे. तर कांबळेश्वर येथील युवकही पुण्याजवळ नोकरीस असून तो थेट रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यामुळे त्याचाही कांबळेश्वरशी संबंध आला नसल्याने कांबळेश्वरकरांना दिलासा मिळाला आहे.
बारामती शहर आणि तालुक्यातील ६३ जणांची काल तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण ५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाचजणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ३४ वर्षीय महिला, मेखळी येथील ६० वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील २९ वर्षीय तरुण आणि बारामती शहरातील आमराई येथील ५९ वर्षीय महिलेसह तिच्या २५ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमेश्वरनगर परिसरातील वाणेवाडी येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात मात्र ही ३४ वर्षीय महिला हडपसर येथील असून ती आपल्या माहेरी जळोची येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाणेवाडीकरांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कांबळेश्वर येथे आढळलेल्या रुग्णाचाही गावाशी संपर्क आला नसून तो युवक मोशी येथून थेट रुई ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाला. त्यामुळे कांबळेश्वरकरानाही दिलासा मिळाला आहे.











