बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात आज सकाळी एक आणि सायंकाळी एक असे दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, आज एकूण ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळी हाती येणार आहेत.
बारामती शहरात मागील आठवड्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. काल कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ६३ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरातील युवकाला आणि सायंकाळी पाटस रस्त्यावरील महादेव मळा येथील रुग्णाच्या भावाला अशा एकूण दोनजणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळी हाती येतील अशी माहितीही डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दुसरीकडे बारामती शहरात उद्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तीन टप्प्यात हा लॉकडाऊन राबवण्यात येणार असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.










