दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरात कोरोना विषाणूचा कहर कायम असून आठ वर्षाच्या चिमुकल्यासह ८५ वर्षाची आजी व २४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड शहरातील कोरोना रूग्णाच्या संपर्कातील २६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यामध्ये ८ वर्षाच्या बालकासह दोन महिलांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल शहरात सात पुरुष व एक महिला कोरोना बाधीत झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. आज पुन्हा शहरात तीन कोरोना बाधीत सापडले आहेत. तर दौंडच्या ग्रामीण भागातील भांडगाव येथे एक कोरोना बाधीत रूग्ण सापडला आहे. संबंधित व्यक्तीचा खासगी अहवाल आला होता. मात्र त्याची शासकीय कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
एकूण २५ पैकी २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. दरम्यान, दौंड शहरासह तालुक्यात आज एकूण चार कोरोना बाधीत सापडले आहेत. शहरातील गल्ली बोळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वा़ढत असल्याने आरोग्य विभागाची डोके दु़खी वाढली आहे.










