मनमानी कारभार केल्याचा सरपंचावर ठपका
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचे सामुहिक राजीनामे ग्रामसेवक व दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडे दिले आहेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयश्री संतोष फडके, भाऊसाहेब वासुदेव फडके,शरद नामदेव चौधरी,स्वाती अनिल चाबुकस्वार,नुरजहाँ रहिमान शेख या पाच सदस्यांनी सोमवारी (ता, १३) आपल्या सदस्य पदाचे सामुहिक राजीनामे दिले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोणतेही कार्यक्रम अथवा उद्घाटन करता येत नाही असे असताना ही विद्यमान सरपंच यांनी कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करीत रविवारी ( ता. १२) ग्रामपंचायत कार्यालयासह विविध कामाचे लोकार्पण कार्यक्रमाचे फलक लावून त्यामध्ये कोणतेही काम पूर्ण झाले नसताना ही अनाधिकृत फलक लावून उद्घाटन केले आहे, केवळ श्रेय मिळावे व आपले नाव फलकावर लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम केला आहे असा ठपका या सदस्यांनी केला आहे. यामुळे गावात व समाजात चुकीचा संदेश जात आहे तसेच असा मनमानी कारभार होत असेल तर ते चुकीचे आहे म्हणून आम्ही आमच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहोत असे नमूद केले आहे.
या राजीनाम्याच्या प्रती दौंड तहसीलदार,जिल्हाधिकारी पुणे व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ईमेल वर पाठविल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांत मुदत झालेल्या ग्रामपंचायती वर शासकीय प्रशासक नेमण्यात येणार आहे म्हणून आपण विकास कामाचे श्रेय आपल्या मिळावे यासाठी असे कार्यक्रम केलेल्याची उलटसुलट चर्चा कानगाव परिसरात आहे .










