राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांची मागणी
दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायत कार्यकारिणीची मुदत येत्या काही दिवसात संपणार आहे, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश शासनाने जारी केला आहे, यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासकीय नेमणूक करताना महिलांनाही ५० टक्के संधी द्यावी अशी लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आल्या असून मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचा आदेश शासनाने नुकताच जारी केला. गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून आपली नेमणूक होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. या प्रशासक पदावर पुरुषांप्रमाणे महिलांनाही संधी मिळाली पाहिजे अशी मागणी गावपातळीवर महिला करू लागल्या आहेत, त्यांच्या मागण्याचा विचार होवा यासाठी नागवडे यांनी या प्रशासक नेमणूकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली.
दरम्यान सध्या तरी ग्रामपंचायत निवडणूका जरी लांबल्या असल्या तरी प्रशासक सरपंच म्हणून मान मिळणार असल्याने इच्छुकांची संख्या ही मोठी असणार आहे, यामुळे रंगत वाढणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे.










