बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १६ जुलैपासून लौकडाऊन झाला आहे. या दरम्यान शहरातील सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वसंतनगर या भागाला आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी या परिसरात राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी घेतली.
बारामती शहरातील वसंतनगर परिसरात तब्ब १४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी वसंतनगरमधील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक असणारे साहित्य आणि तपासणी संदर्भात सूचना केल्या. तसेच स्वयंसेवक महेश गायकवाड, सयाजी गायकवाड, पत्रकार संतोष जाधव यांच्याशी चर्चा करून या परिसरात होत असलेल्या कामाबाबत कौतुक केले. यावेळी सुयश गायकवाड, गौरव जाधव यांच्यासह इतर स्वयंसेवक उपस्थित होते.










