बारामतीत वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बारामतीत बुधवारी दि. १५ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपासून बारामती नगरपरिषद हद्दीतील वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
मागील महिन्यांपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या बारामतीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहर आणि तालुक्यात आतापर्यंत एकूण ६० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अलीकडील काळात बारामती शहरात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण बारामती नगरपरिषदेचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात येत्या गुरुवारपासून वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
बारामतीत अचानक कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन जाहीर केला. या पार्श्वभूमीवर बारामतीतही लॉकडाऊन जाहीर करावा अशी मागणी होत होती. त्यानुसार गुरुवारपासून बारामतीतील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.










