पाटस पोलीस, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीची संयुक्त कारवाई..
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील बिरोबावाडीतील नागरीकांना तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिसटन्स न पाळणे चांगलेच महागात पडले आहे. आज पाटस पोलीस, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत तब्बल २० जणांकडून ४२०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
काल बिरोबावाडीत एकास कोरोनाची लागण झाल्याचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने बिरोबावाडीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील पाटस व बिरोबावाडी परिसरातील २० जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षता व खबरदारी म्हणून या परिसरातील तोंडाला मास्कचा वापर न करता विनाकारण फिरणाऱ्यावर व सोशल डिसटन्स न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरला आहे.
आज येथील २० जणांवर २०० ते ३०० रूपये प्रमाणे ४२०० रूपये दंडात्मक कारवाई करून वसुली केली आहे. या कारवाईत पाटस आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक भिमराव बडे, पोलीस हवालदार घनश्याम चव्हाण, सागर चव्हाण, सुधीर काळे, बिरोबावाडीचे सरपंच बाळासाहेब खारतुडे , ग्रामसेविका सुमन चौधरी आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनीही पाटस, वरवंड, यवत, पारगाव,चौफुला आदी भागात दंडात्मक कारवाई केली होती. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्यांवर अशाच पध्दतीने कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










