पाच जणांना कोरोनाची लागण; तर अद्याप तिघांचे अहवाल प्रतीक्षेत
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ६९ जणांची तपासणी करण्यात आली होती. यातील ६१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभरात शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले असून आता तिघांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
बारामतीत काल जवळपास १८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णांच्या संपर्कातील तब्बल ६९ जणांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्यामध्ये आज दिवसभरात पाचजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अद्याप तिघांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
बारामतीत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेतच उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पुन्हा पाच रुग्ण निष्पन्न झाले असले तरी ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नागरिकांची कसलीही गैरसोय होवू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी नाहक घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी टाळण्याबरोबरच सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर या बाबी काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्याचे महान्यूज लाईव्हशी बोलताना सांगण्यात आले.










