दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरात आज एक तर तालुक्यातील ग्रामीण भागातील बोरीऐंदी येथे एक असे दोन कोरोनाबाधीत रूग्ण आज सापडले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातील १२ जणांची, तर शहरातील ३८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातून दोघेच पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
एका कोरोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कातील १२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील बोरीऐंदी येथील एकास कोरोना विषाणू ची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. तर दौंड शहरातील ३८ पैकी ३६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील एकास कोरोनाची लागण झाली असून अद्याप दोघांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवस सातत्याने दौंड शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. आज जवळपास ४८ जणांच्या तपासणीनंतर केवळ दोघांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने काही प्रमाणात सुटकेचा निश्वास टाकला आहे.










