राजगुरुनगर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीच्याच पुणे जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जाहीर वाद समोर आला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे आणि त्यांच्यात मतदारसंघातील राजगुरुनगर खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी टिकेची झोड उठवली आहे.
तुम्ही स्वत:च्या लोकप्रियतेमुळे नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे खासदार झाला आहात, याचे भान असू द्या असा थेट इशाराच आमदार दिलिप मोहितेंनी डॉ. अमोल कोल्हेंना दिला आहे.
खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा काल वाकी, संतोषनगर येथे झाला. त्यावेळी आमदार मोहिते बोलत होते.
समाजकारण म्हणजे यू ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकणे नव्हे. तुम्हाला मत दिली त्या लोकांची काम करा, सर्वसामान्य लोकांपर्यंत या, असा बोचरा सल्लाही त्यांनी खासदारांना दिला.
या खासदार आणि आमदारांमधली दरी सतत वाढतानाच दिसते आहे. विशेष म्हणजे हे दोघेही राष्ट्रवादीसोबत असले तरी काहीसे दूर जाताना दिसत आहेत. आपल्याच पक्षाचे खासदार आपल्या विधानसभा मतदारसंघातील निर्णय आपल्या परस्पर घेतात. या मतदारसंघात येऊन परस्पर जाहिर कार्यक्रम करतात या गोष्टींचा राग आमदार मोहितेंना आहे.
आमदार दिलिप मोहिते हे नेहमीच स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध राहिलेले आहेत. त्यांनी आज केवळ खासदार कोल्हेच नाही तर पुणे दूध संघाच्या अध्यक्षांवरही जाहिर तोफ डागली. दुध संघाचे अध्यक्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत, डांबरट संचालक पक्षाच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगून पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन दूध उत्पादकांची लूट करीत आहेत अशी खरमरीत टिका त्यांनी केली.
त्यांच्या या टिकेला खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील गटागटांतील स्पर्धेचा संदर्भ असला तरी अशी जाहीर टिका पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोचविणारी ठरणार आहे.