किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
१९ वर्षात काय विकास केला? कुठेतरी थातुरमातुर कामे केली, शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर दिले नाहीत, सात सात महिने कामगारांना पगार नाही आणि वीज बिलाचे आंदोलन करताना बाहेर झोपायचं सोंग करायचं! असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता वन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला.
मंत्री भरणे हे सणसर ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी हिंगणेवाडी येथे बोलत होते. यावेळी मंत्री भरणे यांनी सांगितले की, सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सत्तेचा वापर करावा लागतो. सत्ता आज आहे तर उद्या नाही सामान्य माणसाचे, शेतकऱ्याचे प्रश्न सुटावेत म्हणून मी काम करत आहे. इंदापूर तालुक्याला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे, परंतु शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार सदैव तत्पर आहे. असाही विश्वास त्यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना दिला. यावेळी महिला बचत गटाच्या ग्रामसंघाच्या प्रतिनिधी अंजली श्रीनिवास कदम यांनी मंत्री भरणे यांच्याकडे अस्मिता भवनसाठी इमारतीची मागणी करताच तात्काळ भरणे यांनी त्यास मान्यता देत 10 लाख रुपये मंजूर करत असल्याचे सांगितल्याने महिलांनी मंत्री भरणे यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी श्री छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, छत्रपती कारखान्याचे संचालक, सणसर चे सरपंच ॲड रणजीत निंबाळकर, माजी संचालक संजय निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास छत्रपती कारखान्याचे संचालक डॉ दीपक निंबाळकर, सणसर च्या उपसरपंच राजश्री गुप्ते, सागर भोईटे, हेमंतराव निंबाळकर, दिलीप भोईटे, विक्रमसिंह निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, यजुर्वेंद्रसिंह निंबाळकर, विजयकुमार निंबाळकर, शुभम निंबाळकर, सोमनाथ गुप्ते, नितीन निंबाळकर, वसंतराव जगताप, शैलेश काळे, परशुराम रायते, विष्णुपंत कदम, नरसिंग कदम, तुकाराम कदम, श्रीनिवास कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.