सोलापूर : महान्यूज लाईव्ह
गरवी कांद्याला 30 रुपये प्रति किलो बाजारातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर मिळू लागला आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.. परंतु त्याच वेळी सोलापूरातून एक वाईट बातमी आहे! सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील बापू कवडे या शेतकऱ्याच्या कांद्याला एक टन कांदा बाजारात आणल्यानंतर लिलावातून फक्त 13 रुपये मिळाले आहेत. आडत व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार हा कांदा पूर्णपणे पावसात भिजला होता आणि तो डॅमेज झाला होता. या कांद्याला भाव नाही, मात्र चांगल्या प्रतीच्या कांद्याला भाव असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या सोशल मीडियात एका कांद्याच्या पट्टीची जोरदार चर्चा सुरू असून त्याची पावती सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. टेंभुर्णी भागातील बापू कवडे या शेतकऱ्याने 1 डिसेंबर 2021 रोजी सोलापुरातील कांद्याच्या बाजारात आपला कांदा नेला होता. 1123 किलो कांदा कवडे यांनी बाजारात नेला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लिलाव झाले. 332 किलो कांद्याला दोन रुपयांप्रमाणे दर मिळाला; तर 421 किलो कांद्याच्या नऊ पोत्यांसाठी दीड रुपया किलोने दर मिळाला.
370 किलोच्या आठ पिशव्यांसाठी एक रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळाला. या सर्व कांद्याचे सव्वा टन वजन होते. त्याचे 1665 रुपये रक्कम झाली. 1512 रुपये मोटारीचे भाडे गेले. हमाली 69 रूपये गेली. तोलाई 41 रुपये 55 पैसे, इतर हमाली 29 रुपये एवढी गेली. एकूण खर्च 1651 रुपये झाला; तर कवडे यांच्या कांद्याला एक हजार 665 रुपये मिळाला.
यासंदर्भात व्यापारी रुद्रेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब मान्य केली. त्यांच्या म्हणण्यानुसार कवडे यांचा कांदा पूर्णपणे पावसात भिजून डॅमेज झाला होता. जर कवडे यांनी पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही त्यांना कांदा घेऊन येऊ नका असेच सांगितले असते, मात्र त्यांनी कांदा आणला आणि त्याचा लिलाव करावा लागला. लिलावात खूप कमी पैसे झाले. वास्तविक पाहता कांद्याला सध्या चांगले दर आहेत. गरवी हंगामातील कांद्याला 30 रुपये प्रति किलो दर मिळत असून, हळवी कांद्याला 27 रुपयापर्यंत दर मिळत असल्याचे रुद्रेश पाटील यांनी सांगितले.
दरम्यान या संदर्भात शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी मात्र या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जर कांदा पूर्ण खराब होता तर त्याचा लिलाव नेमका संपूर्ण खर्च जो व्यापाऱ्याचा व वाहतूकीचा होतो, तो भरून काढण्याइतकेच पैसे कसे मिळाले? मुळात जर शेतकऱ्याने दोन महिने घाम गाळून त्याचा कांदा बाजारात नेला होता आणि त्याचा लिलाव अत्यंत कमी किमतीत झाला.
अगदी कवडीमोल किमतीत झाला, तर वर्षानुवर्ष त्या शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे हे आडते त्यांचा खर्च का घेण्याचे टाळत नाहीत? मुळात ज्याने घाम गाळायचा त्याला कात्रजचा घाट हे व्यापारी दाखवतात आणि स्वतःची मात्र पूर्णपणे पैसे काढून घेतात म्हणजे शेतकऱ्याने जे कष्ट केले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांना मिळाले आहेत. हे यातून सरळ दिसते, म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे जेणेकरून ही मधली नफेखोरी कमी होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.