मुंबई : महान्यूज लाईव्ह
ओमीक्रॉन कोराना विषाणूचे जन्मस्थान मानले गेलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या परिस्थितीवर सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र तेथून काही दिलासादायक बातम्याही येत आहेत.
ओमीक्रॉनचा प्रार्दुभाव वाढत असला तरी, तुलने रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण गेले काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत नोंदविले जात आहे.
गुरुवारी येथे ११५३५ रुग्णांची नोंद झाली. यातील बहुसंख्य रुग्ण हे जोहान्सबर्ग या राजधानीच्या गोटेंग उपनगरातील आहेत. हा परिसर ओमीक्रॉन कोरोना विषाणूंचे जन्मस्थान मानला जातो. आठवड्यापुर्वीपेक्षा ही संख्या पाचपटीने जास्त आहे. या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे ओमीक्रॉन कोराना प्रकाराने संसर्गित असावेत असा अंदाज आहे.
मात्र संसर्ग झालेले रुग्णांच्या तुलनेत मृत्यू आणि रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या खुपच कमी आहे. याबाबत अजूनही घाईने निष्कर्ष काढू नये असे तज्ञांचे मत आहे, मात्र लसीकरणामुळे मृत्यूचे आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाले असावे असे सर्वसाधारण मत आहे.
दक्षिण आफ्रिकेत फक्त २५ टक्के लसीकरण झालेले आहे, परंतू हे लसीकरण वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात झाले आहे.
ओमीक्रॉन कोरोनाच्या भीतीमुळे दवाखान्यात रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. परंतू तेथेही गंभीर आजारी व्यक्तींचे प्रमाण फारच कमी आहे. सर्दी होणे, डोके दुखणे यासारखी लक्षणे आढळून येत असल्याचे दक्षिण आफ्रिकेतील सूत्रांकडून समजते.
ओमीक्रॉन जेवढी भीती दाखवली जाते, तेवढा वाईट नाही, असे तेथील एका रुग्णाने सांगितले.