
भय इथले संपत नाही ; दौंड शहरात आज तब्बल १३ नवे रूग्ण
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरात रोज कोरोना बाधितांचे आकडे वाढतच आहेत. आज शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील तब्बल तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे तालुक्यातील एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.
आज तालुक्यातील 13 जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. शहरातील कोरोना रूग्णाच्या संपर्कातील ९४ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, या पैकी ९२ जणांचे अहवाल आले असून १२ जण शहरात तर एकजण दौंडच्या ग्रामीण भागातील आहे.
दरम्यान शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षता व खबरदारी म्हणून १४ दिवस संपूर्ण शहर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहीर केले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
दरम्यान दौंड च्या ग्रामीण भागातील पाटस, पडवी, यवत या भागातील सुमारे ३२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी दिली, यामुळे सध्या तरी ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे.










