दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी काढले आदेश; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची कठोर पावले
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे . मागील काही दिवसात कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जुलै महिन्यात तर दररोज दहापेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून दौंड शहर पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून १४ दिवस शहर बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिले आहेत.
दौंड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी संपुर्ण दौंड नगरपालिका हद्दीत असलेला परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार पुढील १४ दिवस शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यवहार बंद राहणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत धान्य व जीवनावश्यक वस्तूंची विक्री होईल. तसेच सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत दूध घरपोच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रूग्णालय, औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील. शासकीय, आरोग्य विभाग यांच्या व्यतिरिक्त इतर खासगी वाहनांना प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करण्यास अथवा बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. बँक सुविधाही ठराविक काळासाठी सुरू राहणार आहेत. शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुचना करण्यात आल्या आहेत.
बंदच्या काळात नियमांचे उल्लंघन करणारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिले आहेत. दरम्यान, या आदेशाचे सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे. नागरिकांनी स्वतः हून घराबाहेर पडणे टाळावे, कोणाला त्रास होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करावा, तोंडाला मास्क वापरावे, शासनाच्या नियम व अटींचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










