प्रजासत्ताकदिनी बालचमूंना खाऊ आणि तानाजी चित्रपटाची ट्रीट..!
बारामती : जिथं कमी तिथं आम्ही हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी प्रजासत्ताकदिनी बालगोपाळांना आनंदाची पर्वणी उपलब्ध करून दिली.. सकाळी कन्हेरी येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर शर्मिलावहिनींनी बालचमुंशी संवाद साधला.. तर दुपारी बारामती शहरातील रिमांड होम, सावली बाल अनाथगृह यासह विविध शाळांमधील विद्यार्थ्याना खाऊसोबतच तारा चित्रपटगृहात तानाजी चित्रपटाची ट्रीट मिळाली..
प्रजासत्ताक दिनी बारामती तालुक्यातील कन्हेरी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण सोहळा शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते पार पडला.. यावेळी शर्मिलावहिनींनी उपस्थित विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांनी सादर केलेल्या कलागुणांचं कौतुक केलं.. उपस्थित सर्व विद्यार्थ्याना खाऊचं वाटप करत त्यांना प्रजासत्ताकदिनाचं अनोखं गिफ्ट देण्यात आलं.. या कार्यक्रमानंतर कन्हेरी ग्रामपंचायत सभागृहात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ पार पडला.. यावेळी उपस्थित महिलांना शरयू फौंडेशनच्या वतीनं वाण म्हणून रोपांचं वाटप करण्यात आलं..
दुपारी शरयू फौंडेशनच्या माध्यमातून बारामती शहरातील सावली बाल अनाथगृह, रिमांड होम यासह अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तारा चित्रपटगृहात तानाजी या बहुचर्चित चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं.. यावेळी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी शर्मीलावहिनींसोबत चित्रपटाचा आनंद घेतला.. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना बारामतीतील प्रसिद्ध राजापुरी भेळची मेजवानी देण्यात आली..
एकूणच शर्मिला पवार यांनी बालचमूंसोबत दिवस घालवत त्यांना चित्रपट, खाऊ अशा वेगवेगळ्या ट्रीट देत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं प्रजासत्ताकदिन साजरा केला. नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या शरयू फौंडेशनचं वेगळेपण नेहमीच दिसत असतं.. आजही हेच वेगळेपण बालचमूंनी अनुभवलं…!











